अनिस शेख
धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे.
१ ऑगस्ट रोजी महान धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने रात्री ११ वाजता धरणाची पाणी पातळी ८४.२७ टक्क्यांवर पोहोचली होती. धरणात पाण्याची आवक आणि जलाशय परिचालन आराखडा बघता तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता धरणाचे चार गेट प्रति एक फुटाने उघडण्यात आले होते. तब्बल ३८ तासांनंतर ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता चार गेटमधून दोन गेट बंद करण्यात आले होते.
उर्वरित सुरू असलेल्या दोन गेटमधून एक फुटाने गेट उघडून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू होता. दुपारपासून काटा कोंडाला नदीद्वारे पाण्याची आवक धरणात कमी झाल्याने रात्री उशिरा धरणाची पाणी पातळी कमी होत असल्याने ३ ऑगस्ट रोजी रात्री धरणाचे दोन्ही गेट बंद केले व पाण्याचा विसर्ग बंद केला.
पाणी पातळी आणि पाऊस बघता विसर्ग करण्यात येईल. महान धरणात पाण्याची आवक आणि पाऊस बघता धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय वेळेवर घेतला जाणार आहे. धरणातील वाढत्या जलसाठ्याकडे २४ तास बारकाईने लक्ष ठेवून खबरदारी घेत आहोत. - विशाल कुळकर्णी, उपकार्यकारी अभियंता, बोरगाव मंजू.
४४२ मि.मी. पावसाची नोंद
महान धरणस्थळी एकूण ४४२ मिलीमीटर पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. धरणाची पाणी पातळ आणि पाऊस बघता विसर्ग करण्यात येणार आहे. जलाशय परिचालन आराखड्यानुसार १-१५ ऑगस्ट दरम्यान महान धरणात ८५ टक्क्यांपर्यंत जलसाठा आरक्षित ठेऊन त्यावरील अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करावा लागतो.