धाराशिव :
पावसाळ्याचे चार महिने पूर्ण झाले असून, परतीचा पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला, यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, वीज पडल्याने पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे रब्बी हंगामाची पेरणी लांबणार आहे. यंदा ५ जूनपासून पावसाने सुरुवात केली असून, दरम्यानच्या चार महिन्यात दमदार बरसात केली.
यामुळे चार महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ७५७.५ मिमी पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. धाराशिव जिल्ह्याची पावसाची सरासरी ६०३ मिमी आहे. यंदाचा मोसमी पावसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात परतीचा पाऊस होत आहे.
बुधवारी( २ ऑक्टोबर) रोजी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये धाराशिव ग्रामीणमध्ये ३८.८ मिमी पाऊस झाला तर बेंबळी २९.८, पाडोळी २७, जळकोट २८.५, आसू २६६५, ईट ५४, येरमाळा ३०.५, डाळिंब ३८.५, मुरुम ४९.३, जेवळी ३० मिमी पाऊस झाला. यामध्ये अनेक भागात विजा पडल्याने शेळ्यांसह इतर काही पशुधनाचे नुकसान झाले आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ६ ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र, दिवसभर उन्हाचा पार अन् दुपारनंतर अचानक पावसाचे वातावरण निर्माण होत आहे.
चार महिन्यांतील तालुकानिहाय पाऊस
तालुका | पाऊस झाला | टक्के |
धाराशिव | ७८७.४ | १२२.१ |
तुळजापूर | ७७५.५ | ११७.३ |
परंडा | ६३०,२ | १३१.३ |
भूम | ६५७.२ | १११.८ |
कळंब | ८८४.४ | ३८.८ |
उमरगा | ७६१.१ | १३२.८ |
लोहारा | ६७५.९ | १२२.५ |
वाशी | ८४४.५ | १३०.५ |
एकूण | ७५७.५ | १२४.० |
जिल्ह्यात २ व ६ ऑक्टोबर दरम्यान आहे. तुरळक पावसाचा अंदाज जिल्ह्यातील अनेक मंडळात ३० ते ५० मिमी पाऊस झाला आहे. मोसमी पावसाचा कालावधी संपला आहे. - नकुल हारवाडीकर, हवामान शास्त्रज्ञ
रब्बीची पेरणी लांबणार?
खरीप हंगामाचे चार महिने पूर्ण झाले असून, घटस्थापनेपासून रब्बी हंगाम सुरू होतो. घटस्थापनेनंतर बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील
पिकांची पेरणी करतात. मात्र, यंदा १५ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतीचा वाफसा होत नसल्याने मशागत करण्यास
अडचण येणार आहे. यामुळे रब्बीची आगाताची पेरणी शेतकऱ्यांना करता येणार नाही.
यंदा सरासरीपेक्षा १५४.५ मिमी अधिक पाऊस
मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला असून सरासरीपेक्षा १५४.५ मिमी पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्याची ६०३ मिती सरासरी असून प्रत्यक्षात ७५७.५ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे भुगर्भातील पाणीपातळी वाढली असून प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. यामुळे आगामी काळातला पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.
बुधवारी १३.६ मिमी पाऊस
जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी १३.६ परतीचा पाऊस झाला आहे. यामध्ये अनेक मंडळात ३० ते ५० मिमी पाऊस झाला आहे. ऑक्टोबरमध्ये काही दिवस परतीच्या पावसाचे वातावरण राहणार आहे.