- रविंद्र शिऊरकरगेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. ज्यात अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. सोबत काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली तर कोरडवाहू शेतकऱ्यांना मात्र या पावसाने अल्प कालावधीचे हरभरा पिके घेण्यास मदत केली. तर दुसरीकडे मात्र पाऊस बंद झाल्यापासून सुरु असलेल्या सकाळच्या धुईने रब्बी पिके तर खरिपातील कांदा, गहू, लसूण, ज्वारी, मक्का, बाजरी आदी पिके धोक्यात आली आहे.
गहू, हरभरा, ज्वारी, कांदे पिकांसाठी हे धुके हानीकारक असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे. खरीप हंगामातील कपाशी अजून शेतात आहे. त्यातून एक ते दोन वेचण्या मिळू शकतात. मात्र, धुके असेच सतत आणखी काही दिवस राहिले तर त्या कपाशीच्या बोंडात अळी तयार होऊन ती सरकी पोखरू शकते. तसेच गहू, हरभरा आणि ज्वारी हे पिके मावा, बुरशी, मर रोगास बळी पडतील. कांदा पिकांच्या वाढीवर देखील धुक्यांचे परिणाम दिसून येतात ज्यात कांद्याची पात पिवळी पडणे, शेंडे जळणे, करपा येणे असे विविध बुरशीजन्य आजार धुक्यांमुळे कांदा पिकांवर दिसून येत असून यातून उत्पन्न कमी होईल. तसेच कांदा वाढही परिपूर्ण होणार नसल्याचे शेतकरी बोलत आहे.
चालू वर्षी सुरुवातीला पाऊस कमी झाला असल्याने कमी पाणी होते, ज्यामुळे खरीप पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. तरी शेतकऱ्याने लेट खरीप, रब्बी पिकांची लागवड केली त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावत उभ्या पिकांची राखरांगोळी केली तर काही अंशी जे पिके शेतात शिल्लक आहे त्यात आता धुईमुळे रोगराई वाढत असून किटनाशक, बुरशीनाशक आणि औषध खतांचा खर्च निर्माण होणार आहे. सोबत उत्पन्नास फटका बसेल असं असतांना देखील सरकारने निर्यात बंदी करून कांदा दर पाडण्याचा जो कट रचला आहे यात शेतकरी मात्र भरडला जाईल. परिणामी कांदा पुन्हा बळीराजाचेचं अश्रू काढेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.- योगेश पोटे, कांदा उत्पादक शेतकरी, येवला