Join us

Maharashtra Dam Water: राज्यातील लहान,मोठ्या धरणात उरलंय आता एवढंच पाणी, जाणून घ्या विभागनिहाय धरणसाठा

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 11, 2024 1:50 PM

धरणसाठ्यात घट होत असून ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.

राज्यात तापमानात वाढ होत असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे. धरणसाठ्यात घट होत असून ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.

राज्यातील सहा महसूल विभागातील धरणसाठ्यात आज दि ११ मार्च रोजी ४३.७८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणसाठा ६०.५७ टक्के होता.

औरंगाबाद विभागात २२.७१ टक्के 

औरंगाबाद विभागातील ९२० लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये  आता केवळ २२.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  १ हजार ६४८.६३ दलघमी एवढा जिवंत पाणीसाठा आता मराठवाडा विभागातील धरणांमध्ये राहिला आहे. जायकवाडी धरणात आज २४.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून विष्णूपूरीत ५०.७९ टक्के पाणी राहिले आहे. धाराशिवमधील बहुतांश धरणे शुन्यावर पाहोचली असून  तेरणा धरणात आता ५.५३ टक्के पाणी शिल्लक आहे.

नाशिक विभागात किती पाणीसाठा शिल्लक?

नाशिक विभागतील एकूण ५३७ धरणांमध्ये एकूण ४४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात जिवंत २६२०.६९ दलघमी पाणीसाठा असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाठा खालावला असून नागरिकांना पाण्यासाठी टँकरच्या वाटेकडे डोळे लावण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणात ५५.६८ टक्के तर गिरणा, कादवा धरणात ३२.४८ व ३०.०१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पुणे विभागात काय स्थिती

पुणे विभागातील एकूण ७२० धरणांत मागील वर्षी ७०.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.यंदा तो ४५.०७ टक्क्यांवर घसरला आहे. पुण्यातील एकूण धरणांमधील पाणीसाठ्यात सध्या ६८५१.९७ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.

कोकण विभागात ५६.७४ टक्के

कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये ५६.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

नागपूर, अमरावती विभागात काय स्थिती?

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भात सध्या नागपूर विभागात ५३.८४ टक्के तर अमरावती विभागात ५४.७५ टक्के असा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

टॅग्स :धरणपाणी