Join us

Maharashtra Rain : राज्यात पुढील ५ दिवसांत कुठे अन् किती पडेल पाऊस? काय आहेत हवामानाचे इशारे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 7:34 PM

Maharashtra Latest Weather Updates : मागील आठवड्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. पुढील आठवड्यामध्ये सरासरी पेक्षाही कमीच पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

Maharashtra Latest Weather Updates : मागील एका आठवड्यापासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं दिसत आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्येही पावसाचा जोर कमीच असल्याचं हवामान विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील पर्जन्यमानाचा आणि हवामानाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. 

दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामातील पावसाचा विचार केला तर राज्यातील केवळ हिंगोली या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मागील आठवड्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. पुढील आठवड्यामध्ये सुद्धा सरासरी पेक्षा कमीच पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार हे जिल्हे वगळता उद्या (१७ ऑगस्ट) रोजी उर्वरित राज्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. १८ ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Updates)

तर १९ ऑगस्ट आणि २० ऑगस्ट रोजी राज्यातील नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण या काळामध्ये मुसळधार किंवा अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाही. त्यामुळे पुढील पाच दिवसांत राज्यभरामध्ये पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरीपीक