Maharashtra Rain : राज्यात मान्सूनचा पाऊस सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यंदाचा मान्सून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला असून धरणे आणि तळ्यांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांना पाण्याची उपलब्धता होणार आहे. दरम्यान, परतीच्या पावसाला अजून राज्यात सुरूवात न झाल्यामुळे येणारे किमान १५ ते २० दिवस पाऊस राहणार आहे. तर डिसेंबरपर्यंतही सरासरीपेक्षा जास्त पाऊस राज्यात पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवसांत म्हणजे ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाचही दिवसांत विभागून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
उद्या म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पावासाचा येलो अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची आणि विजांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परवा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि दक्षिण विदर्भात पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा संपूर्ण दक्षिण पट्टा आणि विदर्भात पावासाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.