Join us

Maharashtra Rain : MJOची लाट म्हणून मान्सूनची साथ! पुढील ५ दिवस चांगल्या पावसाची शक्यता! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 5:51 PM

Weather Updates : 'एमजेओ'च्या ह्या वारीचे जेव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून तो मध्यम पाऊस पडत आहे.

Maharashtra Latest Weather Updates : 'एमजेओ'(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) ची वि.वृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून २७ जून ते १० जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा 'आम्प्लिटुड' एक च्या आसपास आहे. 'एमजेओ'च्या ह्या वारीचे जेव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून मध्यम पाऊस पडत आहे.

'एमजेओ'ची ही वारी सध्या बंगालच्या उपसागरात प्रवेशली आहे. मान्सूनच्या बंगालच्या उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे व मराठवाड्यात येत्या दोन दिवसानंतर (६ जुलैपासून) तर विदर्भात आजपासूनच पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पश्चिम बंगाल व आसामकडील ७ राज्यात १० जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यताही जाणवत आहे. 

महाराष्ट्रात ५ दिवसांत पाऊस कोणत्या प्रणाल्यामुळे शक्य आहे? मान्सूनने देश काबीज केल्यामुळे देश मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्या शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत एमजेओ व मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

महाराष्ट्रात ५ दिवसांतील विभागवार पावसाची तीव्रता कशी असू शकते?  मध्य महाराष्ट्र - गेल्या १० दिवसापासून हलकेसा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार, धुळे, जळगांव जिल्ह्यांत व पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगांव, देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. परंतु, रविवार दि. ७ जुलैपासून ह्या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव व चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. 

मराठवाडा - मराठवाड्यात उद्यापासून १० जुलैपर्यंतच्या पाच दिवसांत मात्र जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत मध्यम तर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांत किरकोळच पावसाची शक्यता जाणवते. 

कोकण व विदर्भ -कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्याच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तेथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसांत ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया ह्या जिल्ह्यांत मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवते. कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रांत आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवातही होऊ शकते. 

महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधी? विभागवार प्रणाल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस २७ जूनपासून होत आहे. काही जिल्ह्यांत अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. उतार आलेल्या पिकांबाबत जिरायत शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण जाणवत आहे.

परंतु, आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही. अर्थात ही शक्यता ह्या जुलै महिन्यात घडून येऊ शकते.

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune.

टॅग्स :हवामानमोसमी पाऊसपाऊसशेतकरीशेती क्षेत्र