पुणे : दोन दिवसांपासून पावसाने कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ज्या भागात दुष्काळ असतो, नेमका त्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात एक जून ते २१ जुलै या दरम्यान सरासरी ४२४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ५३१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत २५ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे सांगण्यात आली. राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे पडला.
तेथे आतापर्यंत सरासरी १२८.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा २५२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धाराशिव येथे सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के (३१४ मिलिमीटर) पाऊस पडला. तेथे सरासरी १६६.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात या दोन जिल्ह्यांमध्ये सातत्याने पावसाच्या सरी पडत आहेत.
सरासरी गाठलेले जिल्हे
पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती. या जिल्ह्यांमध्ये तेथील पावसाची सरासरी गाठली. तेथे सरासरीच्या तुलनेत उणे १९ ते १९ टक्के पाऊस पडला.
सरासरी ओलांडलेले जिल्हे
सिंधुदुर्ग, सांगली, नगर, बीड, लातूर, परभणी, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ तेथे सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे.
पावसाने ओढ दिलेले जिल्हे
नंदूरबार, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली. तेथे सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. तेथे सरासरी आतापर्यंत २४०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जेमतेम ८५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात असा पडला पाऊस (१ ते २१ जुलै दरम्यान पडलेला पाऊस मिमीमध्ये)
हवामान उपविभाग | सरासरी | प्रत्यक्ष पाऊस | टक्केवारी |
कोकण | १४१३.७ | १९५१.५ | ३८ |
मध्य महाराष्ट्र | ३०७.२ | ३७१.७ | २१ |
मराठवाडा | २४२ | ३०९ | २८ |
विदर्भ | ३८२.६ | ४५५.३ | १९ |
अधिक वाचा: Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा