काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली. संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात पावसाचा जोर चांगला होता. धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून, धरणे ८० टक्के भरली आहेत.
शनिवारी उजनी, मुळा, गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला. दरम्यान, आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या २४ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला. नाशिकच्या गंगापूर धरणातून ७ हजार ४१३ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
विभाग | धरणे | पाणीसाठा |
नागपूर | १६ | ८०.७३% |
अमरावती | १० | ६६.६८% |
छ. संभाजीनगर | ४४ | ३५.५७% |
नाशिक | २२ | ७८.१९% |
पुणे | ३५ | ९१.०६% |
कोकण | ११ | ९५.४३% |
संभाजीनगरात बरसला
छत्रपती संभाजीनगर शहरात जूननंतर थेट शुक्रवारी रात्री आणि शनिवारी मोठ्या पावसाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. शहरात शनिवारी दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. दिवसभरात २१.६ मि.मी पावसाची नोंद झाली.
सीना नदीला पूर
अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीला पूर आला असून, पूल पाण्याखाली गेल्याने नगर- कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुळा धरणातूनही विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडीमध्ये जमा होणार आहे. याचा मराठवाड्याला दिलासा मिळेल.
राजापूर-कोल्हापूर मार्गात दरड कोसळली
■ मुंबईसह ठाणे, कोकण, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.
■ पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या राजापूर-कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा घाटात शनिवारी पहाटे ५च्या सुमारास दरड कोसळली असून, घाट रस्ता बंद झाला आहे.
■ वीर धरणातून नीरा नदीमध्ये तर उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू आहे.
मराठवाड्यातही धो-धो
●बीड जिल्ह्यात २४ तासांत ११ मंडळांत अतिवृष्टी झाली असून, पांगरीतील पर्यायी पूल वाहून गेला. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
● परभणी जिल्ह्यात सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. मुदगल बंधाऱ्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे.
●नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात ९६ टक्के जलसाठा, विष्णुपुरीचे एक, तर लिंबोटीचे तीन दरवाजे उघडले. धाराशिव जिल्ह्यात वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे.
२०० मिमी ची महाबळेश्वरात नोंद
सह्याद्रीच्या पर्वतरांगात पावसाचा जोर अधिक असून महाबळेश्वरला चोवीस तासात २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.