Join us

Maharashtra Rain Updates : राज्यात आज-उद्या मुसळधार! दोन दिवसानंतर पावसाचा जोर होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 8:21 PM

Maharashtra Weather Updates : राज्यात आज आणि उद्या चांगला पाऊस पडणार आहे. तर दोन दिवसानंतर पुढील तीन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Latest Rain Updates : राज्यात सध्या सर्वदूर पावसाची हजेरी असून कोकण आणि पश्चिम घाटात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. तर विदर्भातील पू्र्वेकडील जिल्ह्यांतही चांगला पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, उद्या (२० जुलै) राज्यभरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, धुळे, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

त्यानंतरचे तीन दिवस म्हणजे २१, २२ आणि २३ जुलै रोजी राज्यभरातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजात वर्तवण्यात आली आहे. २१ जुलै रोजी केवळ रत्नागिरी, रायगड आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

राज्यात २२ जुलै रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून कोणत्याही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर २३ जुलै रोजी केवळ रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत येलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच  जिल्ह्यांमध्ये २३ जुलै रोजी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरी