Maharashtra Rain Updates : राज्यामध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडत असून यामुळे राज्यातील एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा हा जोर कमी होण्याची शक्यता आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजावरून दिसून येत आहे. तर कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे.
दरम्यान, मागच्या एका आठवड्यापासून राज्यभरामध्ये जोरदार पाऊस पडत असून पश्चिम घाटात, कोकणात आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. हवामान विभागाने मात्र, राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती दिली आहे.
आज दिलेल्या अंदाजाचा विचार केला तर आज केवळ दोन जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील चार जिल्हे आणि मध्य महाराषट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत येलो अलर्ट असून उर्वरित जिल्ह्यांसाठी कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. काल राज्यातील चार जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यातुलनेत आज एकाही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
कुठे कोणता अलर्ट?
पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.