Maharashtra Rain Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. पश्चिम घाट परिसरातील भातलागवडीचे काम शेवटच्या टप्प्यात असून येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये राज्यातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील तीन जिल्हे, कोकणातील दोन जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातली चार जिल्ह्यांत आणि कोकणातील जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मागच्या एका महिन्यापासून तुलनेने पाऊस कमी पडताना दिसत आहे. तर आज जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
कुठे आहेत अलर्ट?
कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि कोकणातील ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
(Maharashtra Latest Weather Updates)