Maharashtra Rain Updates : मागच्या दोन दिवसांत पावसाने राज्यभरात चांगली हजेरी लावली असून दोन दिवस कमी पावसाचे गेले आहेत. २५ जुलै रोजी राज्यभरामध्ये संततधार पावसाने हजेरी लावली होती. तर पश्चिम घाटामध्ये मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यानंतर पुणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांत राज्यात पावसाने दांडी मारल्याचं दिसून येत आहे. उद्या राज्यामध्ये काही जिल्हे वगळता कमी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, उद्या (ता. २८) कोकण आणि पश्चिम घाटातील काही जिल्हे आणि विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. तर कोकणातील केवळ रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे , नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून पुण्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
कुठे ऑरेंज अलर्ट?
कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कुठे येलो अलर्ट
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापू, पुणे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.