Maharashtra Latest Rain Updates : आज राज्यातील पश्चिम घाटांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज कमी पाऊस पडणार असून पूर्व महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आज कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे येथे मुसळधार पावसाची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम भागात चांगला पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी आणि सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(Latest Rain Updates in Maharashtra)
उद्या राज्यातील रत्नागिरी, सातारा आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्याही राज्यातील मध्य भागांमध्ये पावसाची सरासरी कमी असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.