Maharashtra Latest Weather Updates : आजपासून पुढील गुरूपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायला पाहिजेत. कारण जुलै महिन्याचा मध्य उलटून गेला आहे असंही त्यांनी सांगितलं.पावसाची हजेरी गेल्या चार (१४ते १७ जुलै) दिवसादरम्यान, वर्षच्छायेचा प्रदेशातील ६ जिल्हे (धुळे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर) वगळता कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. पुढील पाच दिवसातील पाऊस? आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे रविवार दि. २१ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत मुंबईसह कोकण व विदर्भातील अठरा जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
पावसासाठी पूरक प्रणाल्या प्रणाल्या
- दिड किमी उंचीचा मान्सून ट्रफ झुकला दक्षिणेकडे
- अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ
- ९०० मीटरवर सौराष्ट्र व कच्छवर च. वाऱ्याची स्थिती
- ३१०० मीटर च्या वर साडेचार किमी जाडीतील नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा शिअर झोन
- परवा शुक्रवार १९ ला बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार
जोरदार व सलग पावसाचा अभाव का?मान्सूनच्या 'सक्रियता व कमकुवतता'चे हेलकावे अजूनही संपलेले नाहीत. त्यामुळे मान्सूनच्या बळकट सक्रियेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीच्या पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. परंतु सध्य:स्थितीतील वरील वातावरणीय प्रणाल्या बघता ही स्थिती निवळेल, असे वाटते.
धरण जलसाठ्याची अवस्था ? मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर ६४० किमी. लांबी व पूर्व-पश्चिम १० ते २० किमी. रुंदीच्या नद्या उगम व धरण पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, ताम्हिणी, वेल्हे, भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी इ. घाटमाथ्यावरील पट्ट्यात मान्सूनची कामगिरी सध्या उत्तम होत आहे. शिवाय सध्याच्या वातावरणीय प्रणाल्याही पूरक जाणवतात. त्यामुळे जुलै अखेर, कदाचित जलसंवर्धनातून धरणसाठ्याची टक्केवारीही कमीतकमी ७०% पर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेवटच्या टप्प्यातील शिल्लक पेरण्या? ज्या शेतकऱ्यांच्या चांगल्या ओलीअभावी खोळंबलेल्या पेरण्या ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता जाणवते. खरीप पेरीचा हा शेवटचा टप्पा समजावा.
- माणिकराव खुळे, Meteorologist (Retd), IMD Pune.