Maharashtra Rain Weather Updates : राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यंदाच्या मान्सून हंगामात पावसामध्ये जास्त खंड पडला नाही. तर वेळोवेळी दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा २६ टक्के अधिकचा पाऊस पडला आहे.
दरम्यान, राज्यातील केवळ एकाच जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे मान्सूनच्या पावसाचे वितरण असमान झाल्याचे चित्र आहे. तर राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील सर्वच धरणांनी शंभरी ओलांडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
येणाऱ्या तीन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातही दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. पण महाराष्ट्रातील हिंगोली या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत उणे २० ते उणे ५० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस हिंगोली जिल्ह्यात पडला आहे.
सप्टेंबरच्या सुरूवातीला हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे येथे पुर आला होता. या पुरामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण विदर्भातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली होती. इतर काळात हिंगोलीमध्ये मोठा पाऊस खूप कमी वेळा पडला आहे, यामुळेच येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे.