Join us

Maharashtra Temperature: विदर्भात उष्णतेने अंगाची लाही लाही, मध्य महाराष्ट्रात तापमानात घट

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 29, 2024 9:19 AM

महाराष्ट्रात तापमानात चढउतार, पुण्यात २९ तर नागपूरात ४५ अंशांची नोंद, उर्वरित भागात...

Temperature Update:राज्यभरात तापमान अर्धशतकाकडे जात असून सूर्य आग ओकत आहे. विदर्भात मागील आठवडाभरापासून प्रचंड उष्मा जाणवत असून उन्हाचा चटका असह्य झाला आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाली असून उष्ण झळांनी बेजार झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

दरम्यान, मंगळवारी नागपूरात ४५.६ अंशांची नोंद झाली. तर अमरावती, वर्धा जिल्ह्यात ४५ अंश तापमान नोंदवले गेले.

तापमानात झाली घट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमान नेहमीच्या तुलनेत काही अंशांनी कमी होते. १ ते २ अंशांनी तापमानात काल घट झाल्याचे नोंदवण्यात आले असून मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत कमी तापमानाची नोंद झाली.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यात मागील दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याचे पहायला मिळत असून ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मंगळवारी पुण्यात २९.९ अंशांची नोंद करण्यात आली असून पुणेकरांना तळपत्या उन्हापासून काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

मध्य महाराष्ट्राला दिलासा

नाशिक सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातही मागील आठवड्याच्या तुलनेत तापमानात घट झाली असून कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पारा घसरला आहे.

मराठवाडी ऊन पाठ सोडेना

मराठवाड्यातही मागील दोन दिवसांच्या तूलनेत काही अंशी घट झाली असली तरी उष्ण झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल ३७.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगर ३६.२ धाराशिव ३७.६, लातुरमध्ये ३८.४ अंश तापमान होते. बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात ४० अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले.

टॅग्स :तापमानहवामानविदर्भमराठवाडापाऊसउष्माघात