Join us

Maharashtra Temperature: पारा हळूहळू उतरतोय! राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 05, 2024 9:31 AM

मान्सूनला तळकोकणात पोषक स्थिती, कोकणातील तापमान मात्र, वाढले.

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून उन्हाच्या कडाक्यापासून काही अंशी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मंगळवारी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीदिवशी कोणाच्या पारड्यात किती मतं पडताहेत याची उत्सूकता टिपेला गेली असताना विदर्भात पारा ४० अंशांवर गेला.अमरावती जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यात काल ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद हवामान विभागाने केली.

राज्यात तळ कोकणात मान्सूनला आता पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात काही भागात पूर्वमान्सून पावसाला सुरुवात झाली असून तापमानात २ ते ३ अंशांनी घट झालेली पहायला मिळत आहे.

मध्य महाराष्ट्रात पारा घसरला

मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा आता घसरला असून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३५ अंशांवर येऊन पोहोचले आहे. मागील काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांचे तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत जातानाची नोंद हवामान विभागाने केली.

कोकणात कसेय तापमान?

कोकणात रायगड, पालघर हे दोन जिल्हे वगळता तापमान १ ते २ अंशांनी घसरल्याची नोंद झाली. काेकणात काल सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशांवर जाऊन पाहोचला होता.

टॅग्स :तापमानहवामानमहाराष्ट्र