पुणे : गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही.
विदर्भात मान्सून येऊन मंगळवारी (दि.१८) सात दिवस झाले तरी पुढे काहीच प्रगती झालेली नाही, त्यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरुवातीला चांगली वेगाने झाली. केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातही वेळेअगोदर हजेरी लावली. परंतु, विदर्भात मात्र चांगलाच रेंगाळलेला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये काही भागात ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. दुष्काळी भाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला असून, इतर भागात काहीच झालेला नाही. मंगळवारी (दि. १८) कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे.
तसेच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम चांगलाच वाढलेला आहे. विदर्भामध्ये मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा असून, मान्सून दाखल होऊनदेखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत.
विदर्भामध्ये पाऊस गायब झालेला आहे, तर दुसरीकडे तापमानाचा चटका सहन करावा लागत आहे. कमाल तापमान चाळिशीपार गेलेले आहे. सोमवारी (दि.१७) विदर्भातील चंद्रपूर (४०.४), ब्रह्मपुरी (४१.९), चंद्रपूर (४०.४), नागपूर (४०.४), वर्धा (४०.०) या जिल्ह्यांचे तापमान चाळिशीपार होते. तर, यवतमाळ (३९.५), गोंदिया (३९.४), अकोला (३९.२) या जिल्ह्यांमध्येही चाळिशीच्या जवळ तापमान नोंदवले गेले.
जोरदार पावसाचा इशारा बुधवारी (दि.१९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.