मान्सूनच्या पावसाने मुंबईपर्यंत मजल मारली असून राज्यभरातही हळूहळू मान्सूनचा पाऊस पोहोचेल. तर सध्या मान्सूनच्या पावसाची स्थिती काय आहे आणि मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी पोहोचेल यासंदर्भातील हा अंदाज...
१ - मान्सूनची मजल सरासरी तारखेच्या एक दिवस अगोदर आज मान्सूनने मुंबईत दमदारपणे प्रवेश करत महाराष्ट्राच्या ठाणे, नगर, बीड व निझामबादपर्यन्त आज मजल मारली.
२ - कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाऊस मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात १५ जूनपर्यंत तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या १० जिल्ह्यात १२ जून पर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते.
३ - विदर्भ मराठवाड्यातील पाऊस स्थिती संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी व उर्वरित बीड अश्या (११+६)१७ जिल्ह्यांत मान्सूनची प्रतिक्षा असून तेथे १२ जूनपर्यंत मध्यमच पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची तर धाराशिव, लातूर, बीड अशा ३ जिल्ह्यांत मध्यमच मोसमी पावसाची शक्यता जाणवते.
४ - मान्सून साठी अनुकूल/प्रतिकूल वातावरणीय स्थिती (i)अठरा डिग्री अक्षवृत्त समांतर, मध्य तपांबंर पातळीतील (४ ते ७. ५ किमी.) उंचीवरील वाऱ्यांचा शिअर झोन व त्यातून तयार झालेला हवेचा कमी दाबाचा आस व(ii) मराठवाडा परिसरातील ९०० मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्याची स्थिती अशा ह्या फक्त दोन वातावरणीय स्थिती मान्सून व त्याच्या प्रगतीसाठी पूरक जाणवतात. तर खालील दोन स्थिती मान्सून मध्ये ऊर्जा भरण्यास कमी पडत आहे.
(i)अरबी समुद्रातील अंशत: चमकलेला 'ऑफ शोअर ट्रफ' आज विरळतेकडे झुकत असल्यामुळे मान्सूनी अरबी शाखाही काहीशी कमकुवत होवू शकते. तर (ii) मान्सूनी बंगालच्या उपसागरीय शाखेत काही अनुकूल बदल नसून ती अजूनही जाग्यावरच खिळलेली दिसत आहे.
- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune.