Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम असतानाच मुंबईत गारठा वाढला आहे. कोकणात देखील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. आज (२८ डिसेंबर) रोजी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वादळी पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
या आठवड्यात २६ डिसेंबरपासून ढगाळ हवामानाला सुरुवात झाली आहे. आज (२८ डिसेंबर) रोजी खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात आणि कोकणातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तापमानात घट झाल्याने दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे. अशीच काहीशी परिस्थिती मराठवाड्यातही पाहायाल मिळाली.
कोकणात वातावरणात बदल झाल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसात रिमझिम पावसाची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* कोकणातील शेतकऱ्यांनी आंबा बागेची योग्य ती काळजी घ्यावी.
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.