Join us

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात मोठा बदल; कुठे गारठा तर कुठे पाऊस IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:10 AM

राज्याच्या हवामानात बदल झाला आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. पुण्यासह काही भागात तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. काही जिल्ह्यात थंडी तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने  दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दिवाळीत थंडी तर काही ठिकाणी पावसाळी वातावरण राहणार आहे. पुढील काही तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही परिसरात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि घट परिसरात

आयएमडी दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) आणि शनिवारी (२६ ऑक्टोबर) रोजी पुणे शहरातील रात्रीचे तापमान १६.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, जे ऑक्टोबर महिन्यातील सर्वात कमी तापमान होते. शहरात २३ ऑक्टोबरपासून रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. शनिवारी (२६ ऑक्टोबर) रोजी देखील २१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून २५ ऑक्टोबर रोजी ते १६.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. याच दरम्यान कमाल तापमानही २३ ऑक्टोबर रोजी ३३.७ अंश सेल्सिअसवरून २५ ऑक्टोबरला ३२.७ अंश सेल्सिअसपर्यंत किंचित घसरले. मात्र, २६ ऑक्टोबर रोजी कमाल तापमानात वाढ झाली असून पुणे शहरात ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून ते सरासरीपेक्षा १.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* मराठवाड्यातील अनेक भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील शंखी गोगलगायी आढळून येत आहेत, त्यामुळे फळबागेत व पिकामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते. त्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात. पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड २  किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे व बागेत झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.

* आष्टुर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टुर या सारख्या फुलांची काढणी पुर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडाविदर्भ