पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात शनिवारी (दि. २८) दरम्यानच्या ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
थंडी, पाऊस, पुन्हा थंडीचा संमिश्र आठवडा असा अनुभव या आठवड्यात येणार असल्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात कोकणसहित राज्यात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडी होती.
त्यानंतर नाताळदरम्यान, ढगाळ वातावरणासह किंचितशी थंडी कमी होऊन राज्यात उबदारपणा होता. सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता जाणवते.
मात्र, वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार, दि. ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन पुन्हा थंडीची अपेक्षा आहे, असे खुळे म्हणाले.
वाऱ्यांच्या टक्करीतून घनिभवन
देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून आणि राजस्थानच्या आग्नेयेला दीड ते दोन किमी उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रिय वाऱ्यांची आणि ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडून तर बंगालच्या उपसागरातून पूर्वे दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची अशा तीन वाऱ्याच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न येते तोच थेट द्रविकरणाची पायरी लगेचच ओलांडून घनिभवन होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे.