Join us

Maharashtra Weather Update : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:08 AM

Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज (२० ऑक्टोबर) ...

Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज (२० ऑक्टोबर) पासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान बदल झाला असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यात आज (२० ऑक्टोबर) रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढलेला दिसतोय. मात्र, काल(२० ऑक्टोर) रोजी दुपारपासून काही भागात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस पडल्याने उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान संध्याकाळच्या वेळेला कडाक्याच्या विजांसह राज्यभरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आज 'यलो अलर्ट' जारी

राज्यभरात आज हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह कोकण विभागात, तसेच गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गोव्यातही पावसाच्या सरी अजूनही बरसत आहेत.

मराठवाड्यात २२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस

आज(२० ऑक्टोबर) रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.मराठवाडयात २२ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पशुधनास हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन गोठ्यात सुरक्षित आणि चांगली व्यवस्था करावी. पाणीचे पाणी स्वच्छ द्यावे.* फुल पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. फुल पिकास आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असताना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.* काढणी केलेली पिकांना सुरक्षित आणि कोरड्या जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमहाराष्ट्रकोकणमराठवाडा