Maharashtra Weather Update : राज्यासह देशाच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, नवरात्रौत्सवात राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार देशातील काही राज्यांमधून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी सुध्दा ईशान्य मान्सूनमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मोसमी हंगामात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान भारतात १०८ टक्के पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा अधिक आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात नवरात्री उत्सवादरम्यान, काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात ५ आणि ६ तारखेला काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनोत्तर हंगामाचा अंदाज जाहीर करताना आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, "आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान सरासरी ३३४.१३ मिमी पाऊस पडेल, जो ११२ टक्के असेल. याला 'हिवाळी पावसाळा' असे म्हणता येईल.
आयएमडीने पुढे सांगितले की, रायलसीमा, यनम, किनारपट्टीआंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये व महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडेल. तामिळनाडूसाठी हा मुख्य पावसाळा असून या काळात राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील 'ला नीना'मुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला नीनाचा प्रभाव हा भारतात ईशान्य मान्सूनवर होत असतो. तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये 'ला नीना'दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.
महाराष्ट्रात ५ आणि ६ तारखेला जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ५ आणि ६ ऑक्टोबरला मुख्यत: विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसांत या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, फवारणीची कामे पावसाची उघडीप बघून करावीत. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. तपमानात वाढ लक्षात घेऊन, जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे, तसेच जनावरांना शक्यतो हिरवा चारा त्याचसोबत पाण्यातून खायचे मिठ द्यावे.