Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळामुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह आता महाराष्ट्राकडे येत असले तरी ढगाळ हवामानमुळे किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळते.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात तापमानात घट झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होत असून आज (१ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे तर काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील तापमानात किमान घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.
तसेच मुंबईतही आता गारठा जाणवू लागला असून त्या पाठोपाठ नाशिक, माथेरान, महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा ८ ते १० अंश सेल्सिअस खाली घसरले आहे.
चक्रीवादळाचा परिणाम
२९ नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरात फेंगल या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे देशात दाट धुके पसरल्याचे चित्र दिसत आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
आज (१ डिसेंबर) रोजी राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (२ डिसेंबर) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबड्याच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबड्याच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळ्या जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
महाराष्ट्रातील तापमान
बदलापूर ११.३, कर्जत ११.७,
अंबरनाथ १२.३, पनवेल १२.६
उल्हासनगर १२.८, कल्याण १३.१
डोंबिवली १३.७, नाशिक ८.९
अहिल्यानगर १०.७, महाबळेश्वर ११.५
सातारा ११.९, जळगाव ११.९
मालेगाव १२.४, अकोला १२.७
नागपूर १३.६, सांगली १४.८
कोल्हापूर १६.७, सांताक्रूझ (मुंबई) १८
रत्नागिरी १८.६, दापोली ८.१०