Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. माघारी फिरण्यासाठी पुढील दोन दिवस अनुकूल वातावरण असून आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. परतीचा पाऊस लांबल्याने आज देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात आज कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (१३ ऑक्टोबर) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस झारखंड, बिहारच्या उर्वरित भागातून तसेच महाराष्ट्र, छत्तीसगडच्या आणखी काही भागातून ओडिशा वेस्ट बंगाल सिक्कीमच्या काही भागातून पुढील दोन दिवसात परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. आज (१३ ऑक्टोबर) रोजी कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य अरबी समुद्रावर आहे.
त्यामुळे आज (१३ ऑक्टोबर) रोजी विदर्भात बऱ्याच ठिकाणी कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर उद्या कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, कोकण विभागातील बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जना व सोसायट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र कोकण गोव्यातील बऱ्याच जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडात मेघगर्जना सोसाटच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस हवामान सामान्यत : ढगाळ राहून वीजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली आहे त्यांनी काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* फवारणीची कामे पावसाची उघडीप बघून करावीत. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुलपिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* वाढते तापमान लक्षात घेऊन जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे, तसेच जनावरांना शक्यतो हिरवा चारा, मिनरल मिक्सर जिवनसत्वे व त्याचसोबत पाण्यातून खायचे मिठ द्यावे.