Join us

Maharashtra Weather Update : आज राज्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रात 'या' भागात पावसाची शक्यता ; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 9:43 AM

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस हलक्या ते मध्य पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडत आहे. त्यामुळे ईशान्य, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर या दरम्यान यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यभरात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. तर, काही भागांत उन्हाचा चटकाही जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यात आज (२२ ऑक्टोबर) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विर्दभातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  तर, राज्यात उद्या(२३ ऑक्टोबर) पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दोन-तीन दिवस पाऊस कायम राहणार

राज्यात पावसाचा जोर येत्या दोन ते तीन दिवस कायम राहणार असून बुधवार (२३ ऑक्टोबर) पासून ढगाळ वातावरणासह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  तर १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची मुख्यतः उघडीप राहील, असेही कळविण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील हवामान 

मराठवाड्यातआज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.  

शेतकऱ्यांना सल्ला 

काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण १४ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ४०० ते ५०० आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी, जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पुन्हा तीन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणुकीदरम्यान होणाऱ्या बुरशीं व किडींपासून बियाण्याचे संरक्षण होईल, असा सल्ला देण्यात आला आहे. 

हवामानाची ताजी माहिती जाणून घेण्यासाठी lokmatagro.com सोबत राहा.

 

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमराठवाडाकोकणविदर्भ