नवी दिल्ली: मे महिन्यात देशभरात वाढत्या तापमानामुळे लोकांची काहिली होत आहे. राजस्थानमध्ये तीव्र उष्णता जाणवत असून, बुधवारी सीमावर्ती बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुढील दोन दिवस पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र व कच्छ परिसरात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात वादळासह पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत मुंबईत आकाश निरभ्र राहील. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम भारतातील किनारपट्टीचा भाग वगळता अनेक जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. पुढील ४८ तास ही परिस्थिती कायम राहणार आहे.