Maharashtra Weather Update : राज्यातून मान्सून परतण्याच्या मार्गावर असताना आज (२३ ऑक्टोबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, उर्वरित राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. राज्यात काही भागांत दिवसा ऊन आणि रात्री पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या भागातील काही जिल्ह्यांत आज वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर, मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच काही भागात ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील जाणवू शकतो. दरम्यान गुरुवार (२४ ऑक्टोबर)पासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील असेही हवामान विभागाने कळविले आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. या ईशान्य, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर या दरम्यान यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह किरकोळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर, १ नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची मुख्यतः उघडीप राहील.
मराठवाड्यात असे असेल हवामान
मराठवाडयात आज (२३ ऑक्टोबर) रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर २ ते ३ अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक आदी पिकाची लागवड करून घ्यावी.
* पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे मुरघास स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करावे जेणे करून चारा टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी.