Maharashtra Weather Update :
सध्या मान्सून राजस्थानमधून जरी परत फिरलेला असला व वायव्यकडून वारे जरी वाहत असले तरी ज्या पद्धतीने तेथे उत्तर भारतात उच्च दाब क्षेत्रे व त्याची पोळ व दक्षिण द्विपकल्पात म्हणजे दक्षिणेकडील ४ राज्यात कमी दाबाचा ट्रफ तयार होत नाही, तोपर्यंत परतीचा पाऊसमहाराष्ट्राकडे झेप घेणार नाही, असे वाटते.
शिवाय अजुनही बंगालच्या उपसागरात बळकट कमी दाब क्षेत्र तयार होऊन देशाच्या वायव्य भागाकडे कुच करत असल्यामुळे परतीच्या पावसाचे वाऱ्यांना आग्नेय दिशेने रेटा बसत असल्यामुळे परतीच्या पावसाचे मान्सून वारे आठवडाभर उत्तर भारतातच अडकले होते.
परंतु परतीचा पाऊस गुरुवार (३ ऑक्टोबर) पासून काहीशी प्रगती साधली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
परतीचा पाऊस
जुन ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी (मान्सून) १०० ते ११० दिवसांत म्हणजे त्याच्या सरासरी निसर्गाने ठरवून दिलेल्या कालावधीत मोसमी पावसाने हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते.
असे झाले तर मान्सूनचे वर्तन हे नैसर्गिक व सुयोग्य समजावे. व त्यामुळेच त्या वर्षभरातील पुढील परंपरेने चालत आलेल्या वातावरणीय घटना पार मार्च - एप्रिल पर्यंत घडत असतात.
या घटना म्हणजे योग्य आवश्यक (मार्चच्या मध्यपर्यंत थंडी, परतीचा पाऊस, बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे व त्यांची सरासरी वारंवारेतील संख्या, कमी गारपीट व माफक धुक्याचे प्रमाण व थंडीतील भू-दवीकरण व भू-स्फटिकिकरण असे सुयोग्य वातावरणीय बदल निसर्गात शेतीसाठी घडून येतात.
उष्णतेत वाढ होते. जमीन तापते पण त्याबरोबरच पूर्णपणे ढगविरहित निरभ्र आकाश असल्यामुळे रात्री जमिनीत दिवसभरात साठवलेली लंबलहरी उष्णताऊर्जा प्रकाशलहरीच्या वेगाने अवकाशात होणाऱ्या उत्सर्जनामुळे पहाटेपर्यंत थंडावते.
म्हणून किमान तापमानात चांगलीच घट होते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात विषुववृत्तदरम्यान उत्तरेकडे म्हणजेच आपल्याही बंगाल उपसागरात अतितीव्र अशी चक्रीवादळे ह्या काळात तयार होतात. व महाराष्ट्रतही पाऊस देतात.
परतीच्या पावसासंबंधीची गफलत
३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पडणारा पाऊस परतीचा पाऊस असतो. कारण ३ ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतत असतांना ३ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात प्रवेश करत १३ ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी सरासरी तारखेप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर पडतो. परंतु संपूर्ण सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसालाच परतीचा पाऊस शेतकरी व मीडिया समजतात.
खरं तर या सर्व तारखात राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरण्याची सुरुवात होणारी व संपूर्ण देशातून मोसमी पाऊस निघून पण फक्त तमिळनाडू मध्ये वेगळं नाव धारण करून तेथे पाऊस सुरु होण्याची तारीख ह्या दोनच तारखा महत्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील ह्या दोन व देशाच्या दोन तारखा ह्यामध्ये विशेष असा काही जास्त दिवसांचा फरक नसतो.
चार महिन्याचा अंदाज व पूर्वालोकन
भारतीय हवामान खात्याने जुन ते सप्टेंबर चार महिन्याचा देश पातळीवरील एकत्रित सरासरी इतका दिलेला अंदाज तसेच प्रत्येक महिन्याचा सुरुवातीला दिलेला त्या - त्या महिन्यांचा मासिक अंदाज हे सर्व सांख्यकी अंकानुसार अगदी बरोबर व हुबेहूब उतरले. असे असले तरी झालेल्या पावसाच्या असमान वितरणातून मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम जोरदार पावसाचा वाटला नाही.
भारतीय हवामान खात्याने जुन ते सप्टेंबर चार महिन्याचा देश पातळीवरील एकत्रित सरासरीइतका दिलेला अंदाज तसेच प्रत्येक महिन्याचा सुरुवातीला दिलेला त्या-त्या महिन्याचा मासिक अंदाज हे सर्व सांख्यकी अंकानुसार अगदी बरोबर व हुबेहूब उतरले आहे.
२०२४ च्या मान्सून अंदाज सरासरी इतका म्हणजे ९६ ते १०४% होता व पाऊस १०८% झाला. संपूर्ण देशात पावसाळी जून ते सप्टेंबर च्या ४ महिन्यात सरासरी ८७ सें.मी. पाऊस होतो. ह्यावर्षी तो ९३.५ सें.मी. म्हणजे १०८ टक्के पाऊस झाला.
महाराष्ट्र देशाच्या ज्या विभागात येतो त्या मध्य भारतात तर तो ११९% पाऊस झाला आहे. ह्यावर्षी मान्सून ३१ मे ला कमी अधिक ४ दिवसाचा फरकाने दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होता व तो मान्सून ३० मे ला केरळ मध्ये दाखल झाला.
पावसाचे खंड
या वर्षीच्या मान्सून कालावधीत ऑगस्ट मध्ये जाणवणारा पावसाचा खंड जाणवला नाही. मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी सरकला नाही. पूर्वोत्तर, यू.पी. व पूर्व भारतात राज्यात पावसाचे प्रमाण कमी म्हणजे सरासरी इतकेच राहिले. त्यामुळे ४ महिन्यात महाराष्ट्रात पाऊस हा भाकीताप्रमाणे सरासरीपेक्षा अधिकच राहिला. - माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे.