पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे.
राज्यामध्ये काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. काही भागात अजून किमान तापमान हे २० अंशाच्या वरती नोंदवले जात आहे. कोकणात रत्नागिरीत किमान तापमान २२ अंशावर आहे, तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान २० अंशाच्या खाली नोंदवले जात आहे.
पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, विदर्भवगळता संपूर्ण महाराष्ट्रात दि. १४ ते १७ नोव्हेंबरला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
निरभ्र आकाशामुळे सकाळ संध्याकाळी काहीशा वाढत्या थंडीला, तीन दिवस विराम मिळेल. हा परिणाम विशेषकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यात अधिक जाणवेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही. रविवारी थंडीसाठी स्थिती पूर्ववत होईल.
राज्यातील किमान तापमानमुंबई : २३.५पुणे : १४.६नगर : १५.३कोल्हापूर : १९.५नाशिक : १३.४सातारा : १६.५सोलापूर : २०.६नागपूर : १६.०यवतमाळ : १५.०
पुढील आठवडाभर महाराष्ट्रात दुपारचे कमाल व पहाटेचे किमान असे दोन्हीही तापमान हे सरासरीइतके राहून कमाल तापमान हे ३१, तर किमान तापमान १५ ते १७ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान राहील. अनेक भागात ढगाळ वातावरण राहील. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ