पुणे: सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये १२ अंशावरून तापमान १० अंशावर नोंदवले जात आहे.
सोमवारी (दि.२५) तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही आतापर्यंत या हंगामातील निचांकी तापमान आहे. सोमवारी 'एनडीए' भागात १० अंशावर तापमान होते.
हवामान विभागानुसार पुढील काळामध्ये देखील राज्यातील अनके भागातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढेल, असा इशारा देण्यात आला.
राज्यावर हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. हवेच्या दाबामध्ये वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढत आहे. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता अधिक वाढवणार आहेत, असाही अंदाज देण्यात आला.
राज्यात हवामान कोरडे व थंड राहणार असून, सकाळी धुके पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. तर १३ अंशांपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणांचीही संख्या लक्षणीय आहे.
थंडीचा कडाका
पुण्यात सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले असून, किमान तापमान १० ते १२ अंशावर नोंदवले जात आहे. 'एनडीए' आणि तळेगाव भागात १० अंशावर किमान तापमान होते, तर माळीण ११.१, शिरूर ११.०, शिवाजीनगर १२.१, हडपसर १४.२, कोरेगाव पार्क १६.२, मगरपट्टा येथे १८.१ किमान तापमानाची नोंद झाली.
किमान तापमान
पुणे : १२.१
जळगाव : १२.४
कोल्हापूर : १६.७
महाबळेश्वर : १२.०
नाशिक : १२.०
सांगली : १५.७
सोलापूर : १५.६
मुंबई : २३.०
परभणी : १२.७
नागपूर : १३.०