Join us

Maharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात काही जिल्हे गारठले; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:36 IST

सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडली आहे. तापमानात मोठी घट असून यामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील चारही विभागातील जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे.

पुण्यात मंगळवारी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगरमध्ये ५.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील पारा हा ८ अंशांवर आला आहे.

पुढील काही दिवस नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्वच भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस त्याची तीव्रता वाढून ते तमिळनाडू किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये येत्या ५ ते ६ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तामिळनाडू, दक्षिण भारतातील पुद्दुचेरी आणि रायलसीमा येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये आज (१८ डिसेंबर) रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरी भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि यानममध्ये १८ आणि १९ डिसेंबररोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि ओडिशामध्येही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्यात येत्या ३ दिवसात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० ते २३ डिसेंबरपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्लाकिमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमहाराष्ट्रकोकणमराठवाडाविदर्भ