Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रातील हवामान मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही भागांत थंडी तर काही ठिकाणी अजूनही उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे तर दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूच्या दिशेने पुढे सरकत आहे. याचे चक्रीवादळात रुपांतर होईल का याकडे हवामान विभागाने लक्ष आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये १३ डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दक्षिण भारतात देण्यात आला आहे.
उत्तर भारतात थंड वारे वाहत आहेत तर दक्षिणेत मुसळधार पाऊस अशी द्विधा स्थिती पुढचे काही दिवस असणार आहे. महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता सध्या तरी वर्तविण्यात आली नाही. मात्र दिवसा ३-५ अंश सेल्सिअस तापमानात वाढ राहण्याची शक्यता आहे. तर रात्री ३-५ अंश सेल्सिअस तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात थंडीचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वाधिक थंडी उत्तर महाराष्ट्रात जाणवेल. याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातील घाटाखाली सुद्धा थंडीची तीव्रता अधिक असेल. तसेच १५ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
अशी तापमानाची नोंद करण्यात आली
पुणे- ३०.१ (१२.३), अहिल्यानगर- २८.२ (११.७), धुळे- २७ (४), जळगाव- २९.४ (८), जेऊर- ३३ (१२.५), कोल्हापूर- ३१.५ (१९.१), महाबळेश्वर- २७.१ (१३.२), मालेगाव- २५.४ (१६.८), नाशिक- २६.५ (९.४), निफाड- २५.९ (८.९), सांगली- ३२.७ (१८.१), सातारा- ३१.७ (१५.८), सोलापूर- ३३ (१९.१), सांताक्रूझ- ३१.८ (१८.०), डहाणू- २९.१ (१४.१), रत्नागिरी- ३१.८ (१८), छत्रपती संभाजीनगर- २९.४ (१२.२), धाराशिव- (१६.३), परभणी- ३०.२ (१२.५), परभणी कृषी विद्यापीठ- २९.५ (१२.९), अकोला- ३०.५ (११.८), अमरावती- ३०.२ (१२.३), भंडारा- २९.८ (१३), बुलढाणा- २५.६ (११.४), ब्रह्मपुरी- ३० (१३.८), चंद्रपूर- २९.८ (१२.५), गडचिरोली- ३० (१३), गोंदिया- २९ (१२.२),नागपूर- ३०.२ (१२), वर्धा- ३०.२ (१२.४), वाशीम- ३२.६ (१९.६), यवतमाळ- ३१ (-).
(कंसात किमान तापमान दिले आहे.)
तापमानाचा पारा घसरला
राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, निफाड येथील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. येथील पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरताना दिसत आहे. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जणवत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
राज्यात आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असल्याने कांदा आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्याचे हवामान हे पोषक राहणार आहे. मात्र, या हवामानामुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.