पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे. मंगळवारी (दि.१९) किमान तापमान ११ अंशांवर नोंदले गेले.
राज्यातील हे सर्वांत कमी किमान तापमान असून, राज्यात अहिल्यानगरलासुद्धा सर्वांत कमी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला १३.८ अंशांवर तापमान होते. त्यापेक्षाही पुणे थंड ठिकाण बनले आहे.
शहरातील एनडीए परिसरात मंगळवारी (दि. १९) सर्वांत कमी ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर शिवाजीनगरला १२.९ तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, दिवाळीमध्ये थंडीचा मागसूसदेखील नव्हता, पण त्यानंतर आता थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या पावसाळी वातावरण आता निवळले आहे.
उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरत आहे. परिणामी, राज्यात थंडी वाढू लागली आहे. मंगळवारी किमान तापमान ११ अशांपर्यंत घसरले असल्याचे दिसून आले.
मंगळवारपासून (दि. १९) राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी आणखी घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सध्या कोमोरिन भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, उत्तर भारतात आकाश निरभ्र आहे. त्याने थंडीत वाढ होत आहे.
राज्यात कडाका वाढला
राज्यातदेखील अनेक भागांत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. अहिल्यानगरमध्ये मंगळवारी ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर मुंबईत २३.६, रत्नागिरीत २०.६, जळगाव १३.८, कोल्हापूर १७.३, महाबळेश्वर १३.८, नाशिक १२.७, सातारा १४.७, सोलापूर १६.८, परभणी १४.६. नागपूर १३.५, गोंदिया १३.२ तापमान होते.