Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे राज्यात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसालाrain पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
मागील २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यात आता एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे गारपीट असे दुहेरी संकट महाराष्ट्रावर घोंगावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २ ते ३ दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे तसेच गारपीट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. डिसेंबर महिना संपत आल्यावर राज्यात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. मराठवाड्यातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत आहेत. आज (२७ डिसेंबर) मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार असून मध्यम तापमानासह उबदार आणि सूर्यप्रकाशित हवामान राहील. तसेच काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या थंडीचा मोसम सुरू असताना पाऊस हजेरी लावणार आहे, तर ३० डिसेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. या महिन्यात हवामानात अनेक बदल होत आहेत त्यामुळे नागिरकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा अलर्ट
आज (२७ डिसेंबर) रोजी हवामान विभागाने नाशिक, पुणे, नगर,जळगाव, धुळे, नंदुरबार,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पाऊसाचा अंदाज लक्षात घेऊन काढणी केलेल्या पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* फवारणीची कामे करताना पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
* हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांचा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Rain Alert : पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा