Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागात आता गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदि जिल्ह्यात तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. गुरूवारी(७ नोव्हेंबर) रोजी सकाळी पुण्यात १५.२ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदविण्यात आले. तर सांगलीत राज्यातील सर्वात कमी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील काही दिवसा राज्यात
थंडीचा कडाका वाढणार असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तर तामिळनाडू व केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पूर्व राजस्थान भागात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यासह जम्मू, काश्मीर, लडाख, बाल्टीस्तान, मुजफ्फराबाद, राजस्थान मध्ये तापमानात फारसा बदल झालेला दिसला नाही.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात उष्णतेत वाढ झाली होती. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे थंडी कधी पडणार? असा प्रश्न सर्वांना पडत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. नाशिकमध्ये १४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंदविण्यात आले.
तर सांगली येथेही १४.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान
शहर | अंश सेल्सिअस |
पुणे | १५.२ |
जळगाव | १५.८ |
महाबळेश्वर | १५.६ |
मालेगाव | १७.८ |
सातारा | १६.६ |
परभणी | १८.३ |
नागपूर | १८.६ |
सांगली | १४.४ |
अहिल्यानगर | १४.७ |
पुण्यात पारा घटला
पुण्यामध्ये गुरूवारी (७ नोव्हेंबर रोजी) तापमानात मोठी घट पाहायला मिळाली. सर्वात कमी तापमान शिवाजी नगर, एनडीए येथे नोंदवले गेले. शिवाजीनगर येथे १५.२ अंश सेल्सिअस तर हवेली येथे १३.४, आणि एनडीए येथे १३.७ तापमानाची नोंद झाली. तर आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे १४.७ किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान हे वडगावशेरीत नोंदविण्यात आले. येथे २१.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मगरपट्टा २०.३ व कोरेगाव पार्कमध्ये १९.३ तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला
मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
शेतकऱ्यांना सल्ला
* लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी. फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
* पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.