बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने छत्तीसगड, उत्तर विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान कोकणासहपुणे, सातारा घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला हवामान विभागाने ७ ते ९ सप्टेंबर या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुणे शहरात कमी आधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच आहेत. त्याशिवाय पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (७ सप्टेंबर) रोजी राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन - तीन दिवसात विश्रांती घेतल्यानंतर परत एकदा मान्सूनचे वारे ६ सप्टेंबर (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले आहे.
'या' जिल्ह्यांना अलर्ट
गणपतीच्या आगमनालाच आज (७ सप्टेंबर) रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑरेंज : रायगड (७ ते ९), रत्नागिरी (८, ९), सिंधुदुर्ग (८), पुणे (८, ९), सातारा (७ ते ९), कोल्हापूर (९)
यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (७ ते ९)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदा मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर मात्र, त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.