Maharashtra Weather Update : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड आणि कारेडे वारे सक्रीय झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २ दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून बहुतांश ठिकाणी २ ते ४ अंशांनी घसरल्याचे हवामान विभागाने सांगितले.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २४ तासांत किमान तापमान वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बुधवारी (८ जानेवारी) रोजी मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तर धुळ्यात किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रावात (Western disturbance) तयार झाला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने २४ तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
राज्यात कुठे पारा घसरला
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर राज्यात दिवसा कोरडे वारे वाहत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली घसरताना दिसत आहे. बुधवारी(८ जानेवारी) रोजी गोंदियात ५.९, हिंगोलीत ९.८, नंदुरबार ७.७, परभणी ८.२, पुणे ११.७, यवतमाळ ६.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
शेतकऱ्यांना सल्ला
* आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये.
* किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून व उबदारपणा रहावा यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.