पुणे : राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. ३०) राज्यातील बहुतांशी भागांत पावसाची उघडीप असेल. राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे, तसेच कोकणातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुधवार (दि. ३१), गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे. हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. सोमवारी दिवसभरात ४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.