Maharashtra Weather Update : राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
मात्र, या पावसाचा जोर आता ओसरला आहे. आज आणि उद्या बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. तर २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. उद्या शनिवारी विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर रविवारी (२७ ऑक्टोबर) रोजी विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हवामान
मुंबईतील हवामान आज कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आता उन्हाचा तडाखा जाणवायला सुरूवात होत असून कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि घाट परिसरातील हवामान
पुण्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे शहर आणि जिल्हा व परिसरात हवामान कोरडे राहणार आहे. आकाश सामान्यत: निरभ्र राहणार आहे. तर अधून मधून काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात देखील वातावरण कोरडे राहणार आहे. पुण्यात आज कमाल तापमान हे २९ ते ३० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे २० डिग्री अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* गहू पिकाच्या उत्तम वाढीसाठी सुपिक जमिन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. कोरडवाहू गव्हाच्या लागवडीसाठी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करावी.
* पुर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी.