Join us

Maharashtra Weather Update : राज्यात 'काही' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 9:34 AM

या आठवाड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा IMD ने दिला आहे. हवामान विभागाचा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update :

पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल असे  वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील मॉन्सूनला आता परतीचे वेध लागले आहेत. या आठवाड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा IMD ने दिला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून नैऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल असे वातावरण असणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात काही जिल्ह्यात, मराठवाड्यात काही  जिल्ह्यांत तर कोकण विभागांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी (२१ सप्टेंबर) रोजी सातारा, सांगली, अहमदनगर तर २१ व २२ सप्टेंबर रोजी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये होणार मेघगर्जना

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाट, मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

घाट परिसरात यलो अलर्ट

पुण्यासह परिसरात आज व उद्या आकाश ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्या हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने दिली आहे.

त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश सामान्य ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. २५ ते २७ सप्टेंबर रोजी आकाश सामान्यता ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान घाट विभागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी मुग, उडीद व सोयाबीन या पिकांची काढणी करावी. तसेच शेतमाल हा कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावे. जेणेकरून शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपले पशुधन कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणमराठवाडाविदर्भ