Maharashtra Rain Update: राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत असून पुण्यासह साताऱ्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या व मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक व जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सून सक्रीय होत असून चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्राला जोडून सौराष्ट्रापर्यंत आहे. हे चक्राकार वारे पूर्व मध्य अरबी समुद्रासह दक्षिण महाराष्ट्रावर सक्रीय आहेत. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आजपासून २२ जून पर्यंत कोकण घाटासह मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे. विदर्भातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून वाऱ्यांचा वेग ४० ते ६० किमी प्रतितास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.