Maharashtra Weather Updates:
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासह काही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२६ सप्टेंबर ) मुंबईत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज हवामान खात्याने मराठवाड्यासह विदर्भात सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाचा मुक्काम २८ सप्टेंबरपर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण झाले आहे. काही भागात पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सर्तक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमुग, मका, बाजरी या पिकांची काढणी दोन ते तीन दिवस पुढे ढकलावी.
* शेतातील जास्तीतचे पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी.
* शेतकऱ्यांनी शेतमाल कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावा.
* सध्या कोणत्याच पिकांवर फवारणी करू नये.
* पशुधन कोरड्या आणि बंधिस्त ठिकाणी बांधून ठेवावे. जेणे करून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.