मुंबई : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांना गारपिटीचाही इशारा दिला आहे.
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट ओसरली
१८ मेपर्यंत मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ व २५ तर उर्वरित महाराष्ट्रात ४० व २६ दरम्यान असेल. उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत
- उत्तर प्रदेशच्या मध्य क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.
- या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
- दोन्ही समुद्रांतून होणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेल्या स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीचे वातावरण तयार झाले आहे.