पुणे : दरवर्षी दिवाळीच्या सणाला थंडीचा कडाका जाणवायचा, त्यामुळे सकाळी उटणे, तेल लावून मालिश केली जात असे. यंदा मात्र थंडी अनुभवायला मिळाली नाही.
किमान तापमान १७-१८ अंशावर नोंदवले गेले, पण म्हणावी तशी थंडी जाणवली नाही. त्यामुळे पुणेकर अजूनही थंडीच्या प्रतीक्षेतच आहेत. यावर हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान खाल्याने वर्तविली आहे.
यंदा चांगला पाऊस पडला आहे पण चांगली थंडी अद्याप पडलेली नाही. या महिन्यात देशामध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रात देखील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहणार असून, राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नुकतीच थंडी विषयीची माहिती दिली होती.
ते म्हणाले होते की, नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहील त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी कमी असेल. यावर्षी ऑक्टोबरमध्ये किमान तापमानाचा पारा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर राहिल्याचे दिसून आले होते.
ऑक्टोबरमध्ये सरासरी २१.८५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा ऑक्टोबरचे सर्वाधिक किमान तापमान ठरले. तसेच १९५१ मध्ये सरासरी २१.२८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
दोन अंशाने घट
दिवाळीमध्ये पुण्यात किमान तापमान १७ ते २० अंश दरम्यान होते. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवला नाही, पण दोन दिवसांमध्ये दोन अंशाने किमान तापमान घसरले आहे. त्यात आणखी घट होऊन हळूहळू थंडी पडण्यास सुरवात होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आजपासून (दि. ५) संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाश सहित पहाटेच्या किमान तापमानात सध्यापेक्षा हळूहळू १ डिग्री से. ग्रेडने घसरण होऊ शकते. त्यामुळे मंगळवारपासून महाराष्ट्रात जोरदार नव्हे, पण हळूहळू थंडीची शक्यता आहे. राज्यात सध्या तरी पावसाची शक्यता नाही. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ