Maharashtra Weather Update : राज्यात आता अवकाळी पावसाचे(Rain) सावट दूर होताना दिसत आहे त्याच बरोबरच आता हळू हळू थंडीचा(cold wave) कडाका वाढताना दिसणार आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात हवामानात(Climate) अनेक बदल(Change) झाले आणि अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने महाराष्ट्रात प्रवेश केला होता.
दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सुरू असणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीसह उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग मंदावल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज ३१ डिसेंबर रोजी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यावर आलेले अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येत्या २४ तासांमध्ये राज्यातून अवकाळीचे ढग पुढे सरकले असून, विदर्भासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा वाढणार आहे.
किनारपट्टी क्षेत्रात मात्र तापमानाचा आकडा वाढल्याची नोंद करण्यात येईल. गारपीटसदृश्य पावसानंतर आता राज्यातील विदर्भ क्षेत्रामध्ये तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मात्र दुपारच्या वेळी उष्मा कायम राहणार असून, संध्याकाळी काही भागांमध्ये तापमानात घट नोंदवण्यात येईल. तसेच पहाटेच्या वेळी राज्यातील बहुतांश घाट क्षेत्रांवर दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअस (धुळे) तर, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस (रत्नागिरी) राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडी कायम
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये प्रचंड हिमवृष्टी होत असून, त्यामुळं या भागातून देशातील मध्य क्षेत्रांकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानसह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्या वर्षाचे स्वागत थंडीने होणार असले तरीही प्रत्यक्ष नव्या वर्षात म्हणजेच ४ जानेवारी २०२५ रोजी नव्याने सक्रिय होणाऱ्या पश्चिमी विक्षोभ देशावर परिणाम होऊन मैदानी क्षेत्रांमध्ये पाऊसधारा आणि पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने कळविले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
हे ही वाचा सविस्तर: Maharashtra Weather Update : वातावरण निवळणार, थंडी वाढणार, पावसाची शक्यता नाही, वाचा सविस्तर