विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर पुढील काही दिवस पावसाचे सावट कायम असेल, असेही हवामान विभागने सांगितले आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असला विदर्भात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाने आज(५ सप्टेंबर) रोजी विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मराठवाडा येथील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज (५ सप्टेंबर) रोजी धुळे नंदुरबार व जळगाव येथे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि धुळे नंदुरबार व जळगाव येथे पावसाचा अंदाज दिलेला आहे.
विदर्भात येत्या दोन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता
आज चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिलेला आहे. पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे ६, ७ व ८ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना ६, ७ व ८ तारखेला यलो अलर्ट दिलेला आहे.
पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात ६, ७ व ८ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ६, ७ आणि ८ तारखेला येलो अलर्ट दिलेला आहे. पुण्यात तुरळक ठिकाणी पुढील पाच ते सात दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ आणि ८ तारखेला पुण्याच्या घाट विभागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे.