Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या गारवा आणि दुपारी प्रचंड उन्हाच्या झळ्या जाणवत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिसअच्यावर पोहोचले आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत. मागील २४ तासांत तापमानात मोठा बदल जाणवत आहे. साधारण ४ ते ५ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.
पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३५.८ अंश सेल्सियसवर होता. तर ठाण्यात ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांगलीत ३७.१ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३-४ दिवसांत तापमानात वाढ होणार असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.(Temperature) एक पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) पाकिस्तान व त्याच्या शेजारील भागावर चक्रीय स्थितीच्या स्वरूपात आहे आणि दुसरीकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती वायव्य राजस्थानमध्ये स्थित आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा नाही, मात्र उन्हाच्या झळ्या दिवसेंदिवस वाढत जातील असेही हवामान विभागाने कळविले आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ३५.८ - ३७.५ यादरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.
* केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.